तामिळनाडूत 12 हजार कोटी रूपयांची कृषी कर्जमाफी

चेन्नई -तामिळनाडू सरकारने शुक्रवारी 12 हजार 110 कोटी रूपयांची कृषी कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना खुष करण्याचा प्रयत्न सत्तारूढ अण्णाद्रमुकने केल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांनी विधानसभेत कृषी कर्जमाफीची घोषणा केली. त्याचा लाभ सहकारी बॅंकांकडून कर्जे घेणाऱ्या 16 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होईल. कृषी कर्जमाफी योजना तातडीने अंमलात येईल. त्यासाठीची आर्थिक तरतूद अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात येईल, असे पलानीस्वामी यांनी नमूद केले. त्यांनी केलेल्या घोषणेवेळी विरोधकांची बाके रिकामीच होती. तामीळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकने विधानसभा अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे.

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशात तामीळनाडू सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उचललेल्या पाऊलाला महत्व आहे. अर्थात, त्या निर्णयाला निवडणुकीचीही पार्श्‍वभूमी आहे. तामीळनाडूत एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी अण्णाद्रमुकची भाजपशी युती निश्‍चित झाली आहे. तर, द्रमुक, कॉंग्रेस आणि इतर पक्षांची आघाडी होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.