शेतकरी, मजुरांना उद्‌ध्वस्त करण्यासाठी बनवले कृषी कायदे

राहुल गांधी यांची मोदींवर टीका

संगरूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून लहान व्यापारी आणि छोट्या उद्योजकांना संपवले. त्याच पद्धतीने शेतकरी आणि मजुरांना उद्‌ध्वस्त करण्यासाठी त्यांनी तीन नवे कृषी कायदे बनवले, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

पंजाबच्या संगरूरमधील सभेत बोलताना राहुल यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारवरील शाब्दिक हल्ला आणखी तीव्र केला. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी एकही धोरण आणले नाही. ती सर्व धोरणे तीन ते चार निवडक मित्रांसाठी (उद्योगपती) बनवण्यात आली, असे त्यांनी म्हटले.

अन्नधान्य खरेदी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. शेतमालाच्या खरेदीसाठी आणखी बाजार उभारले गेले हवेत. शेतमालासाठी किमान आधारभूत किमतीची हमीही हवी.

त्या दिशेने पावले उचलल्यास अंबानी-अदानी पैसे कमावू शकणार नाहीत. त्यामुळे त्या व्यवस्था मजबूत केल्या जात नाहीत, अशा शब्दांत राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले.

नवे कृषी कायदे केवळ शेतकरी आणि मजूरविरोधी नसून संपूर्ण देशविरोधी आहेत. देशाचे स्वातंत्र्य हिरावण्यासाठी ते कायदे आणले गेले आहेत, असे ते पुढे बोलताना म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.