रायपूर – छत्तीसगढमधील भाजप सरकारने सोमवारी भूमिहीन शेतमजुरांना खुष करणारे पाऊल उचलले. त्या शेतमजुरांना दरवर्षी १० हजार रूपयांच्या आर्थिक मदतीची हमी देणाऱ्या योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी केला.
पं.दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना असे नाव संबंधित योजनेला देण्यात आले आहे. त्या योजनेंतर्गत शेतमजुरांना एकाच टप्प्यात रक्कम उपलब्ध केली जाईल.
छत्तीसगढमधील ५ लाख ६२ हजार ११२ शेतमजुरांना योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी राज्य सरकारला दरवर्षी ५६२ कोटी रूपयांचा खर्च येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
शेतमजुरांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी, त्यांचे भविष्य आणखी सुरक्षित बनवण्यासाठी संबंधित पाऊल उचलण्यात आले. छत्तीसगढमध्ये २०२३ यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेली आणखी एक हमी आम्ही पूर्ण केली, असेही ते म्हणाले.
मागील महिन्यातच छत्तिसगढमधील भाजप सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी निवडणूक काळात दिलेल्या आणखी एका आश्वासनाची पूर्तता केली आहे.