Agricultural exhibition: अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बारामती तर्फे आयोजित ‘कृषिक २०२६’ या प्रात्याक्षिके आधारित कृषी प्रदर्शनाचा समारोप रविवारी मोठ्या उत्साहात झाला. यावर्षी प्रदर्शनाने शेतकरी सहभागाचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, शेवटच्या दिवशी प्रदर्शनात शेतकऱ्यांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. खासदार सुनेत्रा पवार आणि सुनंदाताई पवार यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध स्टॉल्सची पाहणी केली व उपक्रमाचे कौतुक केले. समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी कंपन्या व प्रदर्शकांचा संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार आणि उद्योजक विश्वजित वाबळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोप देऊन गौरव करण्यात आला. विविध संस्थांचा सन्मान – प्रदर्शनात तंत्रज्ञान आणि सेवा देणाऱ्या जैन इरिगेशन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्रतिभा बायोटेक, आरडोअर सीड्स, नेचर डिलाईट, राइज एन शाईन, ॲग्रोस्टार, आत्मा, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांसारख्या विविध नामांकित कंपन्या व संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला. पशु-पक्षी प्रदर्शनात सोलापूरच्या कालवडीचा डंका – ‘अप्पासाहेब पवार पशु-पक्षी प्रदर्शना’ अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांनी पशुपालकांचे लक्ष वेधून घेतले. एचएफ (HF) कालवड स्पर्धेत निमगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील प्रदीप पाटील यांच्या कालवडीने प्रथम क्रमांक पटकावून ३१ हजार रुपये व ट्रॉफीवर नाव कोरले. तर आंबेगाव (पुणे) येथील योगेश टाव्हरे व गणेश टाव्हरे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. इतर प्रमुख विजेते: देशी गाय स्पर्धा: देविदास नरवटे (अहमदपूर, जि. लातूर) – प्रथम. देशी वळू स्पर्धा: संतोष कोकणे (नंदादेवी, ता. दौंड) – प्रथम. संकरित वळू स्पर्धा: चंद्रकांत आटोळे (खातगाव, ता. कर्जत) – प्रथम. विजेत्यांना राजेंद्र पवार व विश्वस्त राजीव देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी प्रदर्शनाच्या यशाबद्दल सर्व सहभागी कंपन्या, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि शेतकऱ्यांचे आभार मानले. “हे प्रदर्शन नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरले असून पुढील वर्षीच्या ‘कृषिक २०२७’ साठी आम्ही आतापासूनच सज्ज आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हेही वाचा – Jamkhed: जामखेड शहरात ‘धूमस्टाईल’ चोरीचे सत्र; महिलांमध्ये भीतीचे वातावरण