पुणे – शहरातील करोना रुग्णांची जून महिन्यातील संभाव्य संख्या लक्षात घेऊन महापालिकेने चार रुग्णालयांशी “आयसीयू बेड’ उपलब्ध करून देण्यासाठी करार करण्यात येणार आहे. पालिकेस 19 जूनपर्यंत अंदाजित रुग्ण संख्या लक्षात घेता 3 आयसीयू बेड कमी पडत आहेत. त्यामुळे तेवढेच बेड् न घेता आधीच पूर्वतयारी म्हणून त्यापेक्षा अधिक तयार ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच करार होणार असल्याची माहिती आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
आयुक्त म्हणाले, शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 14 दिवसांचा आहे. त्या आधारावर जून महिन्यात किती रुग्ण वाढतील याचा अंदाज काढला आहे. त्यानुसार, 19 जूनपर्यंत शहरातील एकूण रुग्ण संख्या 12 हजार 896 पर्यंत जाईल. तर त्यात उपचार घेणारे रुग्ण सुमारे 5,477 असतील, त्यातील 4,665 रुग्णांना केवळ उपचारासाठीचे बेड लागतील, तर ऑक्सिजनची सुविधा असलेले सुमारे 548 बेड लागतील. तर आयसीयूची सुविधा असलेले 274 बेड आवश्यक असून 137 व्हेंटिलेटरची गरज असेल.
सध्या पालिकेकडे उपचारासाठीचे 3,539 बेड तयार आहेत. तर ऑक्सिजनची सुविधा असलेले 2,122 बेड आहेत. तर, सुमारे 271 आयसीयू बेड असून 137 व्हेंटिलेटरची बेड सुविधा आहे. त्यामुळे सध्या पालिकेस या नियोजनानुसार, 3 आयसीयू बेडची कमतरता आहे.
दरम्यान, करार करण्यात येणाऱ्या हॉस्पिटलकडून किती बेड दिले जातील यावर चर्चा सुरू असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.