-->

भारत – मॉरिशस दरम्यान व्यापक आर्थिक सहकार्यासाठी करार

पोर्ट लुईस – भारत-मॉरिशस व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करार करण्यात आला आहे. मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाठ, आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत काल, भारत सरकारचे वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान आणि मॉरिशस सरकारचे राजदूत हॅमंडोयल दिल्लम यांनी पोर्ट लुईस येथे या करारावर स्वाक्षरी केली.

“सीईसीपीए’ हा आफ्रिकेमधील देशासोबत भारताने केलेला पहिला व्यापार करार आहे. हा करार मर्यादित स्वरूपाचा असून यामध्ये वस्तूंचा व्यापार, वस्तूंच्या उगमाविषयीचे नियम, सेवांचा व्यापार, व्यापारातील तांत्रिक अडथळे, सॅनिटरी आणि फायटोसॅनेटरी उपाय, तंटा निवारण, दूरसंचार, वित्तीय सेवा, सीमाशुल्क कार्यपद्धती आणि इतर क्षेत्रात सहकार्य यांचा समावेश असेल.

या कराराने उभय देशांमधील व्यापार प्रोत्साहित आणि सुधारित करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणेची तरतूद केली आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यातील “सीईसीपीए’मध्ये भारतासाठी 310 वस्तूंची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे, यामध्ये अन्नपदार्थ व पेये, कृषी उत्पादने, वस्त्रोद्योग व कपडे, धातू व धातूचे सामान, इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिक आणि रसायने, लाकूड आणि लाकडी वस्तू आणि इतर यांचा समावेश आहे. गोठविलेले मासे, विशिष्ठ साखर, बिस्किटे, ताजी फळे, फळांचा रस, बाटलीबंद पाणी, बिअर, अल्कोहोलिक पेय, साबण, पिशव्या, वैद्यकीय व शस्त्रक्रिया उपकरणे आणि कपड्यांसह मॉरिशसला आपल्या 615 उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळणार असून याचा फयदा मॉरिशसला होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.