महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला दहा दिवसांचा कालावधी बाकी असतानाच आणि त्यानंतर तीन दिवसांच्या कालावधीमध्येच मतदारांनी कोणाच्या हातात सत्ता दिली आहे, हे उघड होणार असतानाच राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली आहे. रविवारी अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत निकालानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांसोबत चर्चा केली जाईल असे म्हटले. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये भाजपाचा प्रचार करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा गाजली होती आणि त्यानंतर त्यावर टीकाही झाली होती.
पण आता राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदाचे एवढे दावेदार आहेत की मुख्यमंत्री पदावर नक्की कोण पुन्हा येणार याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. भाजपाचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जाहीर प्रचार सभेत बोलत असताना महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील, अशी घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा प्रचाराच्या व्यासपीठावरून बोलताना देवेंद्र फडणवीस यांना खास गिफ्ट दिले जाईल असे संकेत दिले होते.
दुसरीकडे, भाजपचे नेते विनोद तावडे यांनी एका माध्यम समूहाला मुलाखत देत असताना भाजपमध्ये ज्या नावाची चर्चा असते ते नाव कधीच मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचत नाही, अशा प्रकारचे विधान केले होते. अर्थात, हे विधान त्यांनी स्वतःबाबतीत केले असे सांगण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यामध्ये कोणताही रस नाही. आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार आहोत, अशी घोषणा केली होती.
महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत अशा घडामोडी सुरू असताना महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा पुन्हा एकदा केली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी लावून धरली होती. पण काँग्रेस आणि शरद पवार या दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या या मागणीकडे लक्ष दिले नव्हते.
आता तर शरद पवार यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाचा विचार करता त्यांनी आतापर्यंत कधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढलेली नाही. गेल्या काही कालावधीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोठेही काँग्रेसने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. महाराष्ट्र विधानसभेसाठीसुद्धा काँग्रेसने या नियमाला अपवाद केलेला नाही. ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होईल ही शरद पवार यांची भूमिका त्यांनीही लावून धरली आहे.
महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय चित्रावर जर नजर टाकली तर अनेक आजी-माजी मुख्यमंत्री या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या सर्वांनी आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा अनुभव घेतला आहे आणि सर्वजण निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणूक न लढवणारे पण मुख्यमंत्रिपदाचा अनुभव असणारे अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्रीसुद्धा राजकीय पटलावर कार्यरत आहेत.
उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबत त्यांना कोणतीच अडचण येणार नाही, असेही सातत्याने सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जरी अद्यापपर्यंत मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता आले नसले तरी यावेळी त्यांनी चर्चा आणि तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी इस्लामपूर येथे जाहीर सभेत बोलत असताना जयंत पाटील यांना सर्वात मोठी जबाबदारी मिळू शकते, असे संकेत दिले होते. म्हणजेच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये जयंत पाटील यांचेही नाव आता समाविष्ट झाले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा काही दिवसांपूर्वी मीसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो, अशा आशयाचे विधान केले होते. म्हणजेच एकीकडे राजकीय पक्षांचा प्रचार सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाची फिल्डिंगसुद्धा लावली जात आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हासुद्धा ती आश्चर्यकारक घटना मानण्यात येत होती. कारण देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे यांचा गट त्यांना पाठिंबा दिईल, असे वाटत असतानाच अचानक एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करण्यात आले होते.
अशाच प्रकारचा प्रयोग बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने नितीशकुमार यांच्याबाबतही केला होता. नितीशकुमार यांच्या पक्षाला कमी जागा मिळूनही भाजपाने त्यांना मुख्यमंत्रिपद बहाल केले होते. साहजिकच महायुतीपुरता विचार करता ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईलच असे कोणतेही समीकरण महायुतीच्या नेत्यांनी मांडलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असून निवडणुकीनंतर पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असे सातत्याने भाजपचे नेते सांगत असले, तरी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानामुळे मात्र वेगळा अर्थ निघत आहे.
साहजिकच देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते यावेळच्या प्रचार सभांमध्ये ‘मी पुन्हा येईन’ अशा प्रकारच्या घोषणा जरी करत नसले किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते स्वतःला किंवा आपल्या पक्षातील इतर नेत्याला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत नसले, तरी प्रत्येकालाच हे पद हवे आहे हे गुपित लपून राहिलेले नाही. अर्थात, राजकीय पक्षांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी कितीही घोषणा केल्या आणि स्वप्ने पाहिली तरी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण येणार हे सर्वसामान्य मतदारच ठरवणार आहेत. त्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी होणार्या मतमोजणीची वाट पहावी लागणार आहे.