महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणामध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावर बसलेली महाविकास आघाडी यांच्यामध्ये राजकीय ध्रुवीकरण झाले असतानाच राज्यामध्ये तिसरी आघाडी निर्माण करून मतदारांना अजून एक पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. देशाच्या राजकारणाला तिसरी आघाडी हा प्रकार जरी नवा नसला, तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ अशा प्रकारची कोणतीही तिसरी आघाडी अस्तित्वात नव्हती. दोन प्रमुख आघाड्यांमध्येच दीर्घकाळ विधानसभा आणि लोकसभेची लढाई लढली जात होती.
आता मात्र तिसर्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये नाही, तर या तिसर्या आघाडीचा भाग होऊ पाहणार्या काही नेत्यांनीसुद्धा स्पष्टपणे तसे संकेत दिले आहेत. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने हा तिसर्या आघाडीचा प्रयोग रंगण्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी जालना येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये तिसर्या आघाडीचा आमचा विचार सुरू असून त्यामध्ये मनोज जरांगे येतात का याची चाचपणी करण्यासाठी आम्ही आलो होतो, असे सांगितले होते. गेल्या वर्षभराच्या कालावधीपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी आरक्षण मागणी मान्य नाही झाली तर सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना विधानसभा निवडणुकीत पाडण्याची धमकी दिलीच आहे. शिवाय अधूनमधून ते सक्रिय राजकारणात उतरण्याची घोषणाही करत असतात.
दुसरीकडे अद्यापही महायुतीचा भाग असलेल्या पण नाराज असलेल्या बच्चू कडू यांचा महायुतीबाबत भ्रमनिरास झाल्याने त्यांनीसुद्धा तिसरी आघाडी करण्याबाबत सूतोवाच केले आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्याबाबत कोणतीही सहानुभूती नसल्याने त्यांनीही तिसर्या आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. सध्या तरी तिसर्या आघाडीचा पर्याय म्हणून हे सर्व नेते समोर दिसत असले, तरी नजीकच्या कालावधीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा वंचित विकास आघाडी किंवा एमआयएम या पक्षांनासुद्धा तिसर्या आघाडीमध्ये सहभागी केले जाऊ शकते. मनोज जरंगे पाटील तिसर्या आघाडीचा भाग होणार असतील तर मी त्या आघाडीत सामील होणार नाही, असे जरी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले असले तरी आजपर्यंतचा इतिहास पाहता त्यांची भूमिका बदलू शकते.
एमआयएमच्या नेत्यांनी खरेतर आपल्याला महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्याबाबत अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हा पक्षसुद्धा तिसर्या आघाडीचा पर्याय निवडू शकतो. तिसर्या आघाडीचे यावेळचे हे प्रयत्न निश्चितच ठाम आणि गंभीर असल्याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनाही झाली असल्यानेच त्यांनी छोट्या छोट्या पक्षांना महाविकास आघाडीमध्ये सामील केले जावे अशी भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये जे राजकीय ध्रुवीकरण झाले आहे आणि त्यानिमित्ताने जो काही राजकीय गोंधळ वाढीस लागला आहे त्यामध्ये जर मतदारांना अजून एक पर्याय उपलब्ध झाला, तर कदाचित मतदार तसा पर्याय निवडू शकतात ही जाणीव शरद पवारांसारख्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरी आघाडी जर निर्माण झाली तर त्याचा सर्वात जास्त फटका महायुतीपेक्षाही महाविकास आघाडीलाच बसणार आहे, हे उघड आहे. या व्यतिरिक्त राज्यात तिसर्या आघाडीचा भाग न होणारे जे इतर पक्ष आहेत किंवा अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करणारे काही अपक्ष उमेदवारही असणार आहे.
याचाही विचार या प्रमुख आघाड्यांना करावा लागणार आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा आम आदमी पार्टी असो असे काही पक्ष तिसर्या आघाडीत न येतासुद्धा एखाद्या आघाडीचा खेळ बिघडवू शकतात याची जाणीव अनेक नेत्यांना आहे. राज्यातील राजकारणाचे ध्रुवीकरण झाल्याच्या कालावधीमध्ये राज्यातील डाव्या पक्षांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. तिसर्या आघाडीचा प्रयोग प्रत्यक्षात आला, तर डावे पक्षसुद्धा या आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्याचाही मोठा परिणाम विधानसभा निवडणूक निकालावर होऊ शकतो.
विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी अशा संभाव्य तिसर्या आघाडीबाबत विचारले असताना त्यांनी कदाचित राज्यामध्ये चौथी आघाडीसुद्धा निर्माण होऊ शकते अशा प्रकारचे विधान केले आहे, हेसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी राज्यामध्ये ज्या प्रकारचे राजकारण पाहिले आहे ते पाहता एखादा सक्षम पर्याय मिळाला, तर तो मतदारांना हवाच आहे हेसुद्धा या ठिकाणी नाकारून चालणार नाही. याची जाणीव महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही असल्याने कदाचित विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या आघाड्या अधिक घट्ट करण्याच्या आणि मतभेद कमी करण्याच्या भूमिकेत आता या आघाड्या शिरल्या आहेत. सध्या तरी तिसर्या आघाडीची फक्त चर्चा सुरू आहे. ही आघाडी प्रत्यक्षात अस्तित्वात आली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळू शकते याचे संकेत मात्र निश्चितच मिळत आहेत.