अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तपणे खेळल्या गेलेल्या टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात करून दीर्घकाळाने विश्वचषकावर नाव कोरल्याबद्दल कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्वाखालील सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करायला हवे. भारतीय क्रिकेट संघामध्ये ठासून गुणवत्ता भरली असूनही आणि गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये आयसीसी पुरस्कृत अनेक विश्वचषक स्पर्धांमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या भारताला नेहमीच विश्वचषकाने हुलकावणी दिली होती. पण यावेळी मात्र निर्धाराने खेळ करून रोहित शर्मा आणि त्याच्या सहकार्यांनी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला थरारक सामन्यात हरवून पुन्हा एकदा विश्वचषक ताब्यात घेतला आहे.
टी20 विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्याच्या पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावलेल्या भारताने तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा या विश्वचषकावर नाव कोरले आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय संघाची वेगळ्या प्रकारे जडणघडण करणारा भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा विजय आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण क्रिकेटसाठी ओळखले जाणारे राहुल द्रविड यांना एक खेळाडू म्हणून कधीच विश्वचषक जिंकण्याचा अनुभव घेता आला नव्हता. पण या भारतीय संघाने हा विश्वचषक जिंकून प्रशिक्षक राहुल द्रविड यांना या विश्वचषकाची भेट दिली आहे.
गेल्या वर्षी भारतातच झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत भारताला अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हाही विश्वचषकाने हुलकावणी दिली होती. त्यापूर्वी चार वर्षांच्या कालावधीमध्ये आयसीसी पुरस्कृत कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही भारताला तो विश्वचषकही जिंकता आला नव्हता.1983 मध्ये भारतीय संघाने कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली सर्वात प्रथम 50 षटकांचा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर अशी एखादी विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी 2007 हे वर्ष उजाडावे लागले होते. त्यानंतर 2011 मध्ये भारताने पुन्हा एकदा 50 षटकांचा विश्वचषक जिंकला. पण त्यानंतर गेल्या 13 वर्षांच्या कालावधीमध्ये अत्युत्कृष्ट कामगिरी करूनही भारत या विश्वविजेतापदापासून दूर राहिला होता.
खरेतर गेल्या दहा-बारा वर्षांच्या कालावधीमध्ये क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये वर्ल्ड रँकिंगमध्ये भारत नेहमी पहिल्याच काही क्रमांकावर राहिला आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत धडकण्याचे काम भारतीय संघाने केले होते. तरीही ऐनवेळी पराभव स्वीकारावा लागत होता. मात्र हा शिक्का आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने पुसून टाकला आहे. गुणवत्तापूर्ण फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारताने गोलंदाजीच्या जोरावर ही विश्वचषक स्पर्धा गाजवली आणि जिंकली. अंतिम सामन्यामध्ये सामनावीर म्हणून फलंदाज विराट कोहलीचा गौरव करण्यात आला असला, तरी मालिकावीर म्हणून भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराचा सन्मान करण्यात आला. बुमराने सर्वच सामान्यांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करून भारताला विजय मिळवून दिला त्याला तोड नाही. सुपर 8 फेरीमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय असो किंवा उपांत्य फेरीतील इंग्लंड विरुद्धचा विजय असो जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीनेच या विजयामध्ये मोठा हातभार लावला होता. बुमराव्यतिरिक्त अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि अंतिम फेरीमध्ये हार्दिक पटेल यांनीसुद्धा आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवल्याने भारताला हा विजय मिळवता आला आहे.
एखादा संघ क्रिकेटच्या सर्वच क्षेत्रांमध्ये जर चांगली कामगिरी करत असेल तर त्याला निश्चितच यश मिळते हेच भारतीय संघाने दाखवून दिले आहे. कारण ज्या प्रकारे अंतिम फेरीत ऐन तणावाच्या वेळी सूर्यकुमार यादवने अत्यंत अवघड असा झेल घेऊन या सामन्याला कलाटणी दिली ती निश्चितच महत्त्वाची होती. अशाच प्रकारचा झेल याआधीच्या एका सामन्यामध्ये अक्षर पटेलनेही घेऊन सामन्याला कलाटणी दिली होती. साहजिकच क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी आणि रोहित शर्माचे नेतृत्व या सर्वच बाबतीमध्ये अत्यंत आदर्श कामगिरी झाल्यामुळेच भारताला या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करता आली. एखाद्या स्पर्धेमध्ये एकही सामना न हारता अंतिम फेरीतही विजय मिळवण्याची कामगिरी फक्त भारतासारखा गुणवान संघच करू शकतो.
या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने आपल्या रचनेमध्ये बदल केले नाहीत. पहिल्या सामन्यानंतर जो एकच बदल करण्यात आला तोच संघ उरलेल्या सर्व सामन्यांसाठी कायम ठेवण्यात आला. कारण संघ व्यवस्थापकांनी आपल्या सेनेवर विश्वास दाखवून प्रत्येकाला स्वतःची भूमिका समजून सांगितली होती. परिस्थितीप्रमाणेच रोहितसेनेतील प्रत्येक सहकार्याने आपली भूमिका बजावली असल्यामुळेच प्रत्येक सामन्यामध्ये भारताला यश मिळू शकले. अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी जवळजवळ विजयापर्यंत पोहोचण्याची कामगिरी केली असतानासुद्धा केवळ नेतृत्व बळावर आणि मानसिक धैर्याच्या जोरावर भारताने हा विजय खेचून आणला. एखाद्या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केल्यानंतर ऐनवेळी अंतिम फेरीमध्ये जर अपयश मिळाले तर ते दुःख कधीही सहन होण्यासारखे नसते आणि असे दुःख भारतीय संघाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा पचवले होते. पण आता भूतकाळावर मात करून भारताने पुन्हा विश्वचषकावर नाव कोरले.