सातारा -सातारा मध्यवर्ती बस स्थानकामध्ये अल्पवयीन मतिमंद मुलाने सिगरेटने पडदे पेटविल्याने आगार परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसला आग लागून तब्बल पाच बस जागीच्या भक्ष्यस्थानी पडल्या . या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . या आगीमुळे संबंधित बस कंपनीचे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे .
भागीरथी कंपनीच्या शिवशाही बस एकूण देखभालीच्या दृष्टीने पांढरा हत्ती ठरल्या असल्याने सातारा मध्यवर्ती आगाराने त्या रूटवरून काढून त्या आगाराच्या आवारात उभ्या केल्या आहेत . बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान एका शिवशाही बसमधून अचानक आगीचे लोट येऊ लागले . बघता बघता आग इतकी झपाटयाने पसरली की लगतच्या चार शिवशाही बसेस धडाधड पेटल्या . मोबाईलमध्ये आगीचे चित्रण करणाऱ्या बघ्यांची गर्दी जमून प्रवाशांची सुद्धा धावपळ सुरू झाली.
सुमारे अर्धा ते पाऊण तास धगधगणाऱ्या आगीचा तांडव सुरूच होता . घटनेनंतर पंधरा मिनिटातच सातारा पालिकेचा अग्निशमन बंब तेथे दाखल झाला आणि आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले . आगार व्यवस्थापक एस . एस गाडेकर व कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रे आणून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला . मात्र बचाव यंत्रणेला बघ्यांच्या गर्दीचा वारंवार अडथळा येत होता . अग्निशमन दलाच्या बंबातील पाणी संपल्याने मोठी अडचण झाली . मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीची मदत मिळवत आग आटोक्यात आणली . मात्र पाच शिवशाही गाड्यांची आसने व इतर सुविधा जळून तब्बल एक कोटी रूपयांचे नुकसान झाले अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली .
दरम्यान या अग्नीतांडवाला जवाबदार असणाऱ्या अल्पवयीन मुलाला आगाराच्या काही कर्मचाऱ्यांनी पकडून नंतर पोलिसांच्या ताव्यात दिले . हा मुलगा मतिमंद असल्याची माहिती समोर येत असून त्यानेच सिगरेटने शिवशाही बसचे आतील खिडक्यांचे पडदे पेटवल्याचे स्पष्ट झाले आहे . सातारा शहर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत असून त्या मुलाची अधिक चौकशी सुरू आहे . तो मुलगा शिवशाही बसमध्ये कसा पोहोचला ? बसचे दरवाजे लॉक का नव्हते असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत .