सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर-हवेलीतील विविध घटकांच्या समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडविण्यासाठी आमसभेचे बुधवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात आयोजन करण्यात आले आहे. या आमसभेला नागरीकांनी उपस्थित राहून निवेदनाद्वारे आपल्या समस्या, अडचणी मांडण्याचे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले आहे
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ अमिता पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांसह पुरंदर पंचायत समिती, महसूल विभाग, विद्युत वितरण, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन विभाग, पुरंदर उपसा व जनाई उपसा जलसिंचन योजना,
पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सासवड व जेजुरी नगरपालिकांचे अधिकारी, जिल्हा बँकेचे अधिकारी, सोसायट्यांचे सचिव यांसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
या आमसभेच्या माध्यमातून शासनाच्या अधिका-यांकडून कामकाजाचा आढावा घेण्यात येऊन व त्यानंतर नागरिकांना मत मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. समाजातील सर्व घटकांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे. तसेच शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद आणि समन्वयातून पुरंदरच्या तळातील घटकापर्यंत विविध योजनांचा लाभ देण्यास मदत होईल.
त्यामुळे यापुढील काळात शासनाच्या खात्यांत एकमेकांत आणि लोकप्रतिनिधींमध्ये संवाद व समन्वय राहील असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले. विविध गावांचे नागरीक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायट्यांचे सर्व पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ यांनी लेखी तक्रारीसह उपस्थित राहून समस्या मांडण्याचे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले आहे.