तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच : प्रदूषण मंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
शिक्रापूर – कोरगाव भीमा (ता. शिरूर) येथील इंटरनिस फाईन केमिकल कंपनी बंद करण्यासाठी युवकांनी साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरूच होते. दरम्यान, आंदोलन मागे घेण्यासाठी अज्ञात व्यक्तींकडून दमबाजी केली जात असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील इंटरनिस फाईन केमिकल लिमिटेड कंपनीमधील प्रदूषणाबाबत कंपनी बंद करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी यांनी 16 नोव्हेंबर रोजी दिलेले आहेत. तरी देखील कंपनी सुरूच आहे. ही कंपनी कायमस्वरूपी बंद होण्यासाठी युवकांनी आंदोलन सुरू केले. हे आंदोलन तिसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने या आंदोलनाची साधी दखल सुरू घेतलेली नाही.
इंटरनिस फाईन केमिकल लिमिटेड कंपनी ही नदीच्या कडेला आहे. या कंपनीतील केमिकल युक्त द्रव्य व हवामानामुळे या भागातील पाण्याचे प्रदूषण होऊन जलस्त्रोत व जमिनी नापीक बनलेल्या आहेत. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कंपनी बंदचे आदेश दिलेले होते; परंतु आदेशाला न जुमानता कंपनीने सर्व काही कामे व उत्पादने सुरूच ठेवलेले आहेत. याविरोधात कौस्तुभ दशरथ होळकर यांसह आदी युवकांनी कंपनी समोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू ठेवले आहे.
आंदोलकांना धोका निर्माण होण्याची शक्यता
कंपनीमधील प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध त्रासाबाबत युवकांनी आंदोलन सुरू केले आहे ; पण आंदोलनस्थळी पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नाहीत. तसेच आंदोलकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य अधिकारी उपलब्ध नाही. आंदोलकाला तीन अज्ञात व्यक्तींनी दमबाजी केली असल्याचे आंदोलक कौस्तुभ होळकर याचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाचा दुर्लक्षितपणा उघड होत असून आंदोलकाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.