कृषी कायदे मागे न घेतल्यास संसदेला घेराव

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला इशारा

जयपूर -केंद्रीय कृषी कायदे मागे न घेतल्यास शेतकरी संसदेला घेराव घालतील, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला. दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय केव्हाही होऊ शकतो. त्यासाठी सज्ज रहा, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

राजस्थानच्या सिकरमध्ये झालेल्या शेतकरी महापंचायतीमध्ये टिकैत बोलत होते. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. पुढील आंदोलनाचा भाग म्हणून संसदेला घेराव घालण्याची हाक दिली जाईल. त्याबाबत घोषणा करून दिल्लीकडे कूच केले जाईल. त्यावेळी 4 लाखांऐवजी 40 लाख टॅक्‍टर्स असतील, असे ते म्हणाले.

ते वक्तव्य करताना त्यांनी शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केलेल्या ट्रॅक्‍टर संचलनाचा संदर्भ दिला. सरकारला शेतकऱ्यांचे खुले आव्हान आहे. कृषी कायदे मागे घेतले नाहीत; तर शेतकरी बड्या कंपन्यांची गोदामे उद्धवस्त करतील. त्याचीही तारीख लवकरच जाहीर होईल, असे त्यांनी नमूद केले.

कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर जवळपास तीन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशातून विविध राज्यांत शेतकऱ्यांच्या महापंचायती होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.