उपायुक्‍त कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट 

प्रशासनाकडून गंभीर दखल : एजंटांवर करडी नजर

पुणे – गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत खटल्यांची संख्या वाढल्याने कामगार उपायुक्‍त कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणाची कामगार उपायुक्‍त कार्यालयाच्या प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या एजंटांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनातील कर्मचारी त्यांच्यावर करडी “नजर’ ठेवणार आहेत.

पुण्यातील कामगार उपायुक्‍त कार्यालयाच्या अखत्यारित पुणे शहरासह पुणे जिल्हा आणि पिंपरी – चिंचवडचा समावेश आहे. यापूर्वी या कार्यालयात दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या अगदीच नगण्य होती. मात्र, गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शहरी भागासह ग्रामीण भागातही कारखानदारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे खटल्यांची संख्या काही पटींनी वाढली आहे, हे वास्तव असतानाच या कार्यालयातील मनुष्यबळ फारसे वाढलेले नाही. त्याशिवाय प्रशासनाने पुरेशा सुविधाही उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. परिणामी हे खटले निकाली काढण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत असून तक्रारदारांना “तारीख पे तारीख’ मिळत आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन काही एजटांनी तक्रारदारांना गंडा घालण्यास सुरुवात केली आहे.

खटला लवकरात लवकर निकाली काढून देण्याचे आमिष दाखवून आणि अन्य प्रलोभने दाखवून या तक्रारदारांची लूट केली जात आहे, विशेष म्हणजे बहुतांशी एजटांनी याठिकाणी अक्षरश: त्यांचे व्यवसाय थाटले आहेत. एका खटल्यासाठी हे एजंट तक्रारदारांकडून हजारो रुपये उकळत आहेत. त्याशिवाय त्यांची कामेही वेळेवर करून दिली जात नाहीत. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. त्यामुळे काही तक्रारदारांनी यासंदर्भात प्रशासनाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची दखल घेऊन त्यांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

यासंदर्भात कामगार उपायुक्‍त कार्यालयाचे समन्वयक बी. जी. काळे म्हणाले, तक्रारदारांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यापूर्वी अनेकवेळा करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्या माहितीसाठी कार्यालयात आणि परिसरात माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. तरीही या प्रकारात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे, त्यानुसार यापुढील कालावधीत अशा एजंटावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.