व्हिडिओ : पुन्हा “भुशी’ ओव्हरफ्लो

लोणावळ्यात मुसळधार पाऊस : 77 मिमी पावसाची नोंद

लोणावळा  – दोन आठवडे विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी दमदार हजेरी लावली. शुक्रवारी दुपारनंतर लोणावळा परिसरातील धबधबे पुन्हा एकदा नव्या जोमाने कोसळू लागले होते. विशेषतः भुशी धरणाच्या सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा जोर तर फारच प्रचंड होता. भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचाही जोर वाढल्याने याठिकाणी आलेल्या पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टीने वाहत्या पाण्यात बसण्यास मज्जाव करावा लागला. शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 9 तासात एकूण 77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोसळणारे धबधबे आणि भुशी धरणाच्या सांडव्यावरुन वाहणारे पाणी हे लोणावळ्याचे पावसाळ्यातील वैभव मानले जाते. गेल्या आठवड्यात मात्र पावसासोबत हे वैभव दिसेनासे झाले होते. त्यामुळे कित्येक पर्यटकांना निराश होऊन परतावे लागले होते. स्थानिक व्यावसायिकांना देखील पावसाने मारलेली दडी चिंतातूर केले होती. अखेर दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झाली. विशेषतः शुक्रवारी दुपारनंतर कोसळणाऱ्या अविरत जलधारांनी लोणावळ्याचे वातावरण ओले चिंब करुन टाकले होते.

दोन आठवड्यांपूर्वी मागील वर्षीच्या तुलनेत पुढे चालणारा पाऊस अचानक थांबला होता आणि गेली कित्येक वर्षात जुलै महिन्यात न बघितलेले ऊन लोणावळेकरांनी अनुभवले. मात्र मागील तीन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने पुनरागमन करीत सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. बुधवारी आणि गुरुवारी पावसात म्हणावा असा जोर दिसला नाही. मात्र शुक्रवारी सकाळपासून आणि विशेषतः दुपारनंतर पावसाने जास्तच जोर पकडला.

यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी भरले. दुसरीकडे भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचाही जोर वाढल्याने याठिकाणी आलेल्या पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टीने वाहत्या पाण्यात बसण्यास मज्जाव करावा लागला. आज सुट्टीचा दिवस नसला तरी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवार, रविवार सुटी असल्याने भुशी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)