पुन्हा पारा चाळिशीकडे

वाढू लागला उकाडा : पावसामुळे घसरले होते तापमान

पुणे – गेल्या आठवड्यातील ढगाळ वातावरण आणि सलग तीन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे उतरलेला पारा आता पुन्हा चाळिशीकडे वाटचाल करू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऱ्याने 38 आणि 39 अंश सेल्सियसचे आकडे ओलांडले आहे. तापमानामध्ये वाढ होताच पुन्हा एकदा नागरिकांना चटके बसू लागले आहेत.

यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीतच कमाल तापमानाने उड्डाण घेत 40 अंशाच्या आकड्याला गाठले होते. गेल्या बारा वर्षांमध्ये पहिल्यांदाच मार्च महिन्यात कमाल तापमान इतके वाढले होते. ही काही दिवसांपुरती उष्णतेची लाट असेल, असे वाटत होते. परंतु कित्येक दिवस पारा 40 अंशांच्या आसपासच खेळत होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात आकाशात दाटलेल्या ढगांनी उकाडा आणि दमट वातावरण तर ठेवले होते परंतु पारा मात्र खाली ढकलला होता. 36 अंश सेल्सियसपर्यंत पारा खाली उतरल्यानंतर काही दिवस उष्णतेचा दाह काहीसा कमी वाटत होता. परंतु आता पुन्हा एकदा सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सोमवारी सकाळी पुणे वेधशाळेने नोंदवलेल्या आकड्यांनुसार कमाल तापमान 38.6 अंश सेल्सियस होते तर किमान तापमान 19.9 इतके होते.

पुढील काही दिवस शहरासाठी उष्णतेचे असणार आहेत. वेधशाळेने व्यक्‍त केलेल्या अंदाजानुसार पुढील संपूर्ण आठवडाभर कमाल तापमान 40 अंश सेल्सियस असणार आहे. किमान तापमान 20 ते 21 सेल्सियस दरम्यान असणार आहे. खासगी हवामान संस्था “स्कायमेट’ने देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता वर्तवली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.