दुपारच्या प्रहरी बाजारपेठ थंडावली

दापोडी  –एप्रिलमध्येच उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे. आत्तापासूनच मे महिन्याच्या उन्हाची तीव्रता जाणवायला लागली आहे. यामुळे शहरात दिवसभर अघोषित संचारबंदी पहायला मिळते. बाजारपेठांमध्ये दुपारी शुकशुकाट पसरत आहे. उष्णतेच्या तीव्रतेने शहराचे दैनंदिन जीवन बदलले आहे. तापमानाचा पारा दिवसें-दिवस वाढत चालला आहे.
सकाळी नऊ वाजताच उन्हाचे तीव्र चटके जाणवतात.

अकरानंतर घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवते. परिणामी दुपारी अकरा ते सायंकाळी पाच, साडेपाच पर्यंत बाजारपेठा ओस पडत आहेत. पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव, भोसरी, दापोडी, आकुर्डी, रावेत, चिखली, किवळे, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडी, निगडी आदी भागात कायम वर्दळीच्या असलेल्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची अघोषित संचारबंदी दिसून येते. खरेदी लवकर आटोपती घेऊन अनेकजण घरचा रस्ता धरतात. सकाळच्यावेळी टपऱ्या, उपहारगृहांभोवती दिसणारी गर्दी देखील लवकर आटोपते घेत असल्याचे पहायला मिळत आहे.

मार्च महिन्यात उन्हाचे प्रमाण कमी असल्याने आम्ही पूर्णवेळ दुकानात थांबत होतो परंतु एप्रिल ची सुरुवात होताच उन्हाच्या झळा अधिक तीव्र होतात. परिणामी दुकानात ग्राहक नसतात यामुळे दुपारी दुकाने बंद करून घरी जाऊन आराम करतो पाचला परत दुकाने उघडतो. तसे पाहता व्यवसायाचे थोडे नुकसानच होते. रस्त्यांवर दुपारी बारा ते पाच या वेळेत शुकशुकाट असल्याने थोडे चुकल्यासारखे वाटते, अशी माहिती विक्रेते अनिकेत उपाध्याय यांनी दिली. ग्राहकांच्या अपेक्षेने आम्हाला दिवसभर गुऱ्हाळावर थांबावे लागते. परंतु, सायंकाळी सहा वाजल्यानंतर खरी गर्दी होते, अशी माहिती कपिला महाजन यांनी दिली. उन्हामुळे फळे पालेभाज्या देखील लवकर खराब होतात. हिवाळ्यात व पावसाळ्यात भाजी व फळे बरेच दिवसापर्यंत चांगली राहतात. उन्हाच्या तीव्रतेमुळे फळे, पालेभाज्यांची आवक घटत असल्याचे फळे व भाजीपाला संघटनेचे उमेश दांडगे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात भर दुपारी बाहेर जाणे म्हणजे अंगाची लाही लाही करून घेणे आहे. यासाठी आम्ही सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत घराच्या बाहेर जाणे टाळतो. मुलांची परीक्षा संपली असली तरी तीव्र उन्हामुळे बाहेर पडता येत नाही.

– मेघना पंडित, गृहिणी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.