नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट सध्या त्याच्या सर्वोच्च स्थितीत आहे. अशाच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्न असते. मात्र वाढत्या स्पर्धांमुळे अनेकांना या स्वप्नापासून मुकावे लागते. यामुळे अनेक युवा खेळाडू नवीन संधी शोधत आहे.
अमेरिकेने क्रिकेटला चालना देण्यासाठी “मायनर क्रिकेट लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये जगभरातील खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे क्रिकेटमध्ये भविष्य करण्याचे स्वप्न असलेले खेळाडू अमेरिकेची वाट धरत असून या भारतीय क्रिकेटपटूही आघाडीवर आहेत.
19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताला 2012 साली जेतेपद जिंकून देणारा कर्णधार उन्मुक्त चंदने काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत अमेरिकेत खेळण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ अनेक भारतीय खेळाडूंनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यातच आता हरमीत सिंग याचे नाव जोडले गेले आहे.
हरमीत सिंगने 2012 साली भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. हरमित हा फिरकीपटू गोलंदाज आहे. हरमीत देखील आता अमेरिकेतील स्पर्धेत सहभागी होणार आहे. ज्यामध्ये त्याने “सिएटल थंडरबोल्ट’ या संघाशी 3 वर्षांचा करार देखील केला आहे. हरमितने प्रथम श्रेणीमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
याबाबत हरमीत सिंग म्हणाला, मी जुलै महिन्यातच निवृत्त झालो होतो. कारण, मला मुंबई संघाकडून खेळण्याची संधी मिळत नव्हती. जो माझा घरेलू संघ आहे. मला अमेरिकेत खेळण्यासाठी चांगले पैसे मिळत आहेत. यामुळे माझी भविष्याबाबतची चिंता मिटली आहे. तसेच तेथील क्रिकेटचा स्तर देखील खूप चांगला आहे.
जर तुम्ही नियमित 30 महिने अमेरिकेमध्ये व्यतीत केले, तर तुम्हाला अमेरिकेच्याच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. मी आता माझे अमेरीकेतील 12 महिने पूर्ण केले आहेत. आता माझे केवळ 18 महिने बाकी आहे. 2023च्या सुरुवातीपर्यंत मी अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरू शकतो. तोपर्यंत मी 30 वर्षांचा होईल आणि एका फिरकीपटूसाठी ते योग्य वय आहे, असेही तो म्हणाला.
दरम्यान, हरमीत सिंग पूर्वीही अनेक भारतीय क्रिकेटपटंनी अमेरिकेचा रस्ता पकडला आहे. यामध्ये उन्मुक्त चंद, समित पटेल, मनन शर्मा, सिद्धार्थ त्रिवेदी, मिलिंद कुमार आणि आता हरमीत सिंग या सर्व खेळाडूंनी मायनर क्रिकेट लीग स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.