“उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर शस्त्र कधी आणि कोणासाठी काढायची हे कळेलच’ – संजय राऊत

मुंबई – दरवर्षी होणारा शिवसेनेचा बहुचर्चित दसरा मेळावा गेल्या वर्षी करोनाच्या सावटाखाली पार पडला. यंदाही करोना प्रादुर्भाव असला तरी दसरा मेळावा होणार, असे महत्वाचे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. मात्र, यंदाचा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये होणार आहे.

दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते. आज देखील हा मेळावा होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात फोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील विकास कामांबाबतचे विशेष सादरीकरण आज केले जाईल.

दरम्यान, या मेळाव्या पूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. “संध्याकाळी जेव्हा उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहतील तेव्हा विजायदशमीनिमित्त जी शस्त्रं काढली जातात ती कोणासाठी कशासाठी काढली जातात हे कळेल असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.