कोलकाता – भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीतील मोठ्या हिंसाचारानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. बंगालच्या हसनाबाद आणि डायमंड हार्बर या दोन ठिकाणी नरेंद्र मोदी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील.
तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या येथील रोड शोवेळी मंगळवारी तुफान राडा झाला. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही.
राड्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. दरम्यान, शहांना कुठलीही इजा पोहोचली नाही. रोड शो सुरू असताना एका महाविद्यालयाच्या वसतिगृहातून शहा यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कथित कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तिथे लावण्यात आलेल्या अनेक दुचाकींची त्यावेळी मोडतोड करण्यात आली.