कुडाळ- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अखेर विजयाचा गुलाल अंगावर पडताच जावळी सोसायटी मतदारसंघाचे विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी सर्वप्रथम थेट सुरुची गाठून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यामुळे ज्ञानदेव रांजणे यांच्या पाठीशी खरी ताकद आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीच होती हे अधोरेखित झाले आहे.
आमदार भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे या दिगज नेत्याचा होमपीचवरच पराभव करून आपली मतदारसंघावर मजबूत पकड असल्याचे सिद्ध केले. विजय मिळवल्यानंतर ज्ञानदेव रांजणे यांनी प्रथम आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली व आजचा विजय हा जावळीतील सर्वसामान्य जनता, माझे दैवत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पक्षाचे नेते अजित पवार यांना मी हा विजय समर्पित करत असल्याचे रांजणे यांनी सांगितले.
ज्ञानदेव रांजणे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अत्यंत निकटचे विश्वासू व कट्टर समर्थक मानले जातात. ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यासुद्धा जावळीतील कुसुंबी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या आहेत. राजकारणात नवखे असणारे रांजणे दाम्पत्य गेल्या पाच वर्षांपासून जावळीतील राजकारणात सक्रिय असून, राजकारणासह समाजकारणात त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याने अल्पावधीतच रांजणे दाम्पत्याने जावलीतील जनतेला आपलेसे केले आहे. रांजणे यांच्या विजयासाठी वसंतराव मानकुमरे, जयदीप शिंदे, हणमंतराव पार्टे यांनी सहलीवरील मतदारांचे परफेक्ट नियोजन केले होते. त्यांच्या नियोजनासमोर शशिकांत शिंदे यांची टीम कमी पडल्याने रांजणे विजयी झालेचे आज चित्र पाह्ययला मिळाले.