न्यूयॉर्क : काही दिवसांपूर्वी अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला सुरू असलेली आर्थिक मदतही थांबवण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेनंतर ब्राझिलमध्येही करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, अमेरिकेनंतर आता ब्राझिलनेही जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ब्राझिलने संघटनेवर पक्षपातीपणाचा आणि राजकारण केल्याचा आरोप केला आहे.
जर जागतिक आरोग्य संघटनेने पक्षपाती करणे सोडले नाही तर ब्राझिल या संघटनेतून बाहेर पडण्यावर विचार करेल, असा इशारा ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष झायर बोल्सोनारो यांनी दिला. लॅटिन अमेरिकेत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकसह पश्चिम आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये करोना धोका अधिक वाढत आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गरेट हॅरिस यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून ब्राझिलमध्येही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सध्या लॅटिन अमेरिकेसहित आफ्रिकन देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी युरोपीय देश मात्र यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आले आहेत. फिनलँडमध्येही करोनाचा प्रादुर्भाव जवळपास संपला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंमध्येही १४ दिवसांपासून कोणताही नवा रुग्ण सापडला नाही. तर इटली, स्पेन आणि ब्रिटनमधून वाढणारी रुग्ण संख्याही कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे.