तृणमूल प्रवेशानंतर केंद्राने काढली मुकुल रॉय यांच्या मुलाची Y सुरक्षा

कोलकाता – राज्यतील विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपच्या गोटात सामील झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची सध्या जोरदार घरवापसी सुरु आहे. अशातच काल (शुक्रवारी) भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय भाजपला रामराम ठोकत मुलासह तृणमूल काँग्रेसमध्ये परतले. रॉय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा तृणमूलचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, पक्षांतरानंतर दुसऱ्याच दिवशी मुकुल रॉय यांचे पुत्र शुभ्रांशू रॉय यांना केंद्रातर्फे देण्यात आलेली वाय दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. आता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य पोलिसांवर सोपवण्यात आली आहे.

तत्पूर्वी, तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीत केंद्र सरकारतर्फे आपल्याला देण्यात आलेली सुरक्षा काढून घेण्यात यावी अशी मागणी केली होती. या पत्रानंतर आज त्यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

मुकुल रॉय यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले ते पहिले बडे नेते मानले जात होते. मात्र विधानसभा निवडणुकांपूर्वी सुवेंदू अधिकारी यांचा भाजप प्रवेश व त्यानंतर निवडणुकांमध्ये त्यांना देण्यात आलेले महत्व यांमुळे रॉय नाराज असल्याची वृत्त होती. अखेर रॉय यांनी, शुक्रवारी तृणमूलमध्ये प्रवेश केला.       

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.