लखनौ: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बसपा अध्यक्ष मायावती यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. मात्र, याच मायावती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याचा दावा बसपाचे माजी नेते नसिमुद्दीन सिद्दीकी यांनी केला आहे.
नसिमुद्दीन हे मायावती यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जायचे. ते जवळपास 33 वर्षे मायावती यांच्यासोबत होते. मात्र गेल्या वर्षी त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बसपा व भाजपच्या युतीविषयी बोलताना नसिमुद्दीन म्हणाले, मी मायावती यांना त्यांच्या स्वत:पेक्षा जास्त चांगले ओळखतो. राजकारणात काहीही अशक्य नाही. मायावती यांनी याआधीही भाजपशी हातमिळवणी केली आहे. 23 मे ला निकालानंतर त्यांच्यावर अशा प्रकारे दबाव निर्माण करण्यात येईल की त्या स्वत: भाजपसोबत जातील.