कारवाईनंतरही साताऱ्यात मटका तेजीत

गोडोली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गत दोन आठवड्यात अवैध धंद्यांवर धाडी टाकत आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. शहरातील मोठ्या मटक्‍या अड्ड्यांसह आडोशाला चालणाऱ्या मटका धंद्यांवरही छापा टाकला. त्यानंतर काही तासातच पुन्हा आहे त्याच ठिकाणी हे धंदे त्याच जोमाने सुरु असल्याने पोलिसांनी कारवाईचा नुसता फार्स केला का असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परजावर याआधीही अनेकवेळा पोलिसांच्या धाडी पडल्या आहेत. मात्र अलिकडच्या दोन आठवड्यात या अड्ड्याला टार्गेट करत चारपाच वेळा धाडी टाकण्यात आल्या. तसेच या अड्ड्याचा मालक असलेल्या दुसऱ्या ठिकाणच्या धंद्यावरही धाडी टाकण्यात आल्या. मात्र या दोन्ही ठिकाणी काही तासातच पुन्हा हा धंदा जैसे थे सुरुच होता. साताऱ्यात सध्या अनेक ठिकाणी मटका व्यवसाय बोकाळला आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकून आपली कर्तव्य दक्षता दाखवणाऱ्या पोलिसांना पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन ठिकाणचा मटक्‍याचा व्यवसाय बंद करण्यास आजअखेर यश आलेले नाही.

एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याची नव्याने नेमणूक झाली की या धाडी टाकल्या जातात. दरवेळी धाड टाकली की ठराविक पंटरचीच नावे घेतली जातात. त्यांच्या रितसर न्यायालयात चकरा सुरु होतात आणि त्याठिकाणी पुन्हा तोच पंटर मटका घेतो हे चक्र अव्याहतपणे सुरु आहे. काही दिवसांपूर्वी एका बड्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मटका बुकीने मारहाण केली होती. बसस्थानक परिसरात त्याचा व्यवसाय आजही त्याच जोमाने सुरु आहे. मटका व्यवसायात होणारी लाखोची उलाढाल आणि त्यावर पोसलेली काही मंडळी असे लागेबांधे असल्यानेच साताऱ्यात मटक्‍यावर होत असलेली कारवाई म्हणजे नुसता फार्स ठरत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.