खड्ड्यांनंतर आता गटारांचे विघ्न

ड्रेनेज चेंबरची झाकणे मोडकळीस : रस्त्यांवरही पाणी

पुणे – सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दैना झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचून खड्डे पडले आहेत. तर बहुतांश ठिकाणी रस्त्यावरील पावसाळी गटारे, ड्रेनेज चेंबरची झाकणे मोडकळीस आली आहे. यामुळे पादचारी आणि वाहनचालक यांना त्रास सहन करावा लागत असून, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याबाबत विविध भागांतील नागरिकांकडून सातत्याने महापालिकेकडे तक्रारी येत आहेत.

महापालिकेतर्फे शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज चेंबर उभारण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी या चेंबर्सवर लोखंडी झाकण लावण्यात येते. शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी तसेच पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी हे चेंबर्स बसविण्यात येतात. मात्र, अनेकदा रस्त्याच्या मधोमध असलेल्या या चेंबर्समुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य व्यवस्थापनाअभावी अनेक चेंबर्सवरील झाकणे अर्धवट तुटलेली, जमिनीत गाडली गेलेली अथवा सरकलेली असतात. तर पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाणी जमा होऊन होत असलेल्या प्रवाहामुळे या चेंबर्सच्या आसपास रस्ता खचून त्याठिकाणी खड्डे पडतात.

मी नेहमी सातारा रस्त्याने प्रवास करतो. भापकर पेट्रोल पंपचौकात मधोमध ड्रेनेज चेंबर बसविण्यात आले आहेत. त्यातच रस्त्याच्या कामामुळे या चेंबरची उंची खालावली आहे. त्यामुळे याठिकाणी खोलगट भाग तयार झाला आहे. पावसामुळे येथील परिस्थिती अजून खराब झाली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोच, शिवाय वाहनचालकांच्या आरोग्यालादेखील त्रास उद्‌भवत आहे. महापालिकेने तातडीने या चौकातील चेंबर आणि खड्‌डयांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
– माधव काळे, अरण्येश्‍वर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.