नवी दिल्ली – दिल्ली सरकारचा 2023-24 चा अर्थसंकल्प बुधवारी विधानसभेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री कैलाश गेहलोत यांनी पहिल्यांदाच विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचा 9वा अर्थसंकल्प सादर केला. मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर कैलाश गेहलोत यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.
अर्थमंत्री कैलाश गेहलोत यांनी बुधवारी 2023-24 साठी एकूण 78 हजार 800 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
जाणून घेऊया दिल्ली सरकारच्या बजेटमधील काही मोठ्या गोष्टी
अरविंद केजरीवाल सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी 9 हजार 742 कोटी रुपये दिले आहेत. आरोग्य क्षेत्र बळकट करण्यासाठी सरकार काम करेल. दिल्लीतील रुग्णालयातील खाटा 14 हजारांवरून 30 हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहेत.
दिल्ली स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक बनवण्याचे काम केले जाईल. ओखला लँडफिल डिसेंबर 2023 पर्यंत आणि गाझीपूर लँडफिल डिसेंबर 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद होईल, असा दावा अर्थमंत्री कैलाश गेहलोत यांनी केला.
दिल्ली सरकारचा 2023-24 चा अर्थसंकल्प परिवहन, शिक्षण आणि आरोग्यावर केंद्रित आहे. दिल्लीचा अर्थसंकल्प ‘स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक दिल्ली’भोवती बांधला गेला आहे.
दिल्ली सरकारने अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी 16 हजार 575 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकार टप्प्याटप्प्याने दिल्लीतील 350 शाळांमध्ये किमान 20 नवीन संगणक उपलब्ध करून देणार आहे. तसेच, सरकार सर्व शिक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक आणि DDEs यांना नवीन टॅबलेट प्रदान करेल.
अरविंद केजरीवाल सरकारने आपल्या बजेटमध्ये मोहल्ला क्लिनिकनंतर मोहल्ला बस योजना सुरू केली आहे. मोहल्ला बसेस आता दिल्लीत धावणार आहेत. या योजनेअंतर्गत 9 मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जाणार आहेत.
ISBT बस पोर्ट म्हणून विकसित केले जाईल. यासोबतच द्वारकामध्ये एक ISBTही बांधण्यात येणार आहे. NBCC च्या सहकार्याने दोन सहा मजली बस डेपो बांधले जातील. 9 नवीन बस डेपो बांधण्यात येणार आहेत. दिल्लीत बससेवा अशा प्रकारे बनवली जाईल की श्रीमंत लोकही त्यांच्या गाड्या सोडून बस वापरतील.
दिल्लीतील जनतेला 24 तास पाणी देण्यासाठी सरकार काम करत आहे. 2025 पर्यंत 1240 एमजीडी पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल.
परिवहन क्षेत्रासाठी घोषणा करताना अर्थमंत्री कैलाश गेहलोत म्हणाले की, लवकरच २६ नवीन उड्डाणपूल बांधले जातील. 26 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प बांधकामाच्या टप्प्यात आहेत, तर 11 प्रकल्प मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये दिलेल्या सर्व सुविधांची देशभर चर्चा आहे. ज्यामध्ये केजरीवाल सरकारने दिल्लीत दिलेल्या आरोग्य सिविधा असतील किंवा आधुनिक शाळा असतील सर्वांकडे रोल मॉडेल म्हणून पाहिलं जात. यामुळे आता अरविंद केजरीवाल यांनी नव्या अर्थसंकल्पात सांगितलेल्या या प्रमुख गोष्टी दिल्लीकरांसाठी किती लाभदायक ठरतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.