नोएडा (उत्तर प्रदेश) – कानपूर चकमकीनंतर स्थानिक मफियांच्याविरोधात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर छापासत्र सुरू केले आहे. गौतम बुद्ध नगर पोलिसांनी कुख्यात गॅंगस्टर सुंदर भाटी, अनिल दुजाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या जमीन, लक्झरी कार जप्त केल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या छापासत्राला शनिवारी ग्रेटर नोएडामधून सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सूचनांवरून पोलीस आयुक्त आलोक सिंह यांनी 7 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असल्याचे ग्रेटर नोएडाचे पोलीस उपायुक्त राजेश कुमार सिंह यांनी सांगितले.
या गॅंगने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली जमीन आणि पाण्याचे स्रोत शनिवारी पुन्हा ताब्यात घेण्यात आले. या जमिनींवरील बेकायदेशीर कुंपणे पाडून टाकण्यात आली आहेत. या ठिकाणची अवैध मालमत्ता
जप्त केली जाणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले.
अनिल दुजाना टोळीतील सदस्य चंद्रपाल याच्या मालमत्तांनाही जप्त करण्यात आले असून त्याची वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. तर टोळीतील आणखी एक सदस्य रॉबिन त्यागीची पत्नी दिव्या
संगवानचीही मालमत्ता जप्त केली आहे.
जप्त केलेल्या कारमध्ये ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. गॅंगस्टर विरोधी कायद्यांतर्गत पोलीस आयुक्तालयाने केलेली ही पहिली मोठी जप्तीची कारवाई आहे.