उंब्रज – शिवडे ता. कराड गावच्या हद्दीतील पाटण पंढरपूर राज्य महामार्गावरील कृष्णा नदीवरील पूल गेले तीन दिवसांपासून पाण्याखाली गेला होता. गुरूवारी पावसाने काही प्रमाणात उघडीप दिलेल्या पूल पाण्याच्या वर आला. मात्र पुलाची तपासणी झाल्याखेरीज वाहतुकीसाठी खुला केला जाणार नसल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांकडून समजते.
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उंब्रजसह परिसरात हाहाकार माजवला होता. जनजीवन विस्कळीत झाले असताना उंब्रज ता. कराड गावच्या हद्दीतून जाणाऱ्या तारळी, कृष्णा, उत्तरमांड नद्यांना महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान, राज्य मार्गावरील कृष्णा नदीवर उंब्रज-मसूर जाणाऱ्या रोडवरील राज्य मार्गाचा पूल रविवारी रात्री उशिरा पाण्याखाली गेला होता. पुलाचे पाणी गुरुवारी ओसरले असून पूल पाण्याच्या वर आला.
सद्यस्थितीत पूल पाण्याच्या वर दिसत असला तरी पुलाचे संरक्षण कठडे वाहून गेले आहेत. रस्ता जागोजाग उखडल्याने मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पुरातून वाहत आलेली झाडे पुलाला अडकल्याने पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाटण-पंढरपूर राज्य मार्गावरील वाहतूक बंद आहे. पुलाची योग्य डागडुजी तसेच तपासणी झाल्यानंतर पूल वाहतूकीस सुरू केला जाणार असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले. आहे. तसेच पोलिस यंत्रणेला सूचना करण्यात आल्या आहेत.