पटना – बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीपासूनच लोक जनशक्ती पक्षातर्फे नितीश कुमार व जनता दलाला ‘टार्गेट’ करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान नितीश कुमारांविरोधातील आपला पवित्रा प्रचारसभांमध्ये देखील कायम ठेवला आहे. अशातच आज पासवान यांनी नितीवंश कुमार यांचा उल्लेख ‘पलटीमार’ असा करत, ‘विधानसभा निवडणुकांनंतर ते एनडीएला रामराम ठोकून विरोधकांच्या महाआघाडीत सामील होतील’ असा खळबळजनक दावा केला आहे.
यावेळी पासवान यांनी लोजप भाजपशी यापुढेही एकनिष्ठ राहील असं देखील म्हटलंय. “नितीश कुमार यांनी वारंवार पलटीमारत ‘पलटीमार’ हा किताब मिळवला आहे. बिहारमध्ये ते लालू प्रसाद यादव यांच्यासमवेत प्रदीर्घ राजकीय लढा लढून सत्तेत आले. मात्र काही वर्षांतच त्यांनी आपला जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबतची युती तोडत लालूंसोबतच्या आघाडीत पलटीमारली.” असा आरोपही त्यांनी लगावला.
नितीश कुमारांवर आणखी हल्ला चढवताना पासवान म्हणाले, “राष्ट्रीय पातळीवर नितीश कुमार स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील चेहरा म्हणून पाहत होते. गेल्या विधानसभा निवडणुकांवेळी त्यांनी लालूंसोबत मोदीविरोधी प्रचारही केला. मात्र निवडणुकांना दोन वर्षही उलटली नाहीत तोवरच त्यांनी पुन्हा एकदा पलटीमार भाजपसोबत सामील झाले.”
“माझे शब्द लिहून ठेवा, प्रचारसभांमध्ये नितीश कुमार लालूंविरोधात जोरदार प्रचार करत असले तरी त्यांचा मागचा इतिहास पाहता ते विरोधकांच्या आघाडीमध्ये सामील होऊ शकतात. स्वतःला २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांचा मोदीविरोधातील चेहरा म्हणून स्वतःला पुढं करण्याचा प्रयत्नही ते करू शकतात.” असा दावाही पासवान यांनी केला.