पेट्रोल 9 दिवसांत 83 पैशांनी महागले
नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया संपल्यानंतर सामान्य जनतेला इंधन दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. मागील 9 दिवसांत लिटरमागे पेट्रोल 83 पैशांनी तर डिझेल 73 पैशांनी महागले आहे.लोकसभा निवडणुकांच्या काळात सार्वजनिक इंधन कंपन्यांनी दरवाढ टाळली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनांच्या किमती वाढूनही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे होते.
मात्र, लोकसभा निवडणुकांसाठीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान 19 मे यादिवशी झाले अन् पुढच्याच दिवसापासून इंधन दरवाढीचे सत्र सुरू झाले. मंगळवारीही ते कायम राहून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे 11 आणि 5 पैशांची वाढ झाली.त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 71 रूपये 86 पैसे आणि डिझेलचा दर 66 रूपये 69 पैसे इतका झाला. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 77 रूपये 47 पैशांवर आणि डिझेल 69 रूपये 88 पैशांवर पोहचले. याआधी विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या काळातही सार्वजनिक कंपन्यांनी इंधन दरवाढ टाळली होती.