निवडणुकीनंतर हास्य विनोदात रमले राजकीय प्रतिस्पर्धी

मंचर येथे खासगी कार्यक्रमात वळसे पाटील आणि आढळराव पाटील एकत्र

मंचर- आंबेगाव विधानसभा निवडणुकीत गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. निवडणुका म्हटल्यावर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी दोन्ही नेते सोडत नाहीत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले होते. परंतु, मंचर येथे मंगळवारी (दि. 22) झालेल्या एका खासगी कार्यक्रमात दोन्ही नेते शेजारी बसून हास्य विनोदात रमलेले दिसले. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बरेच काही सांगून जात होते. याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने राजकारणात कोणीही कोणाचा शत्रु नसतो हेच या नेत्यांनी दाखवून दिले.

सोमवारी (दि. 21) विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 22) मंचर येथील प्रवर्तक अभिजीत समदडिया आणि महावीर संचेती यांच्या निमंत्रणावरुन पीएनजी ज्वेलर्सच्या उद्‌घाटनासाठी वळसे पाटील, आढळराव पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा आले होते. त्यावेळी तिन्ही नेते हास्य विनोदात रंगले होते. एकमेकांच्या कानात काहीतरी बोलत असताना समोर असलेल्या ग्राहकांनी डोळे भरुन हास्य विनोद पाहिला.
दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे जीवलग मित्र होते. परंतु, सन 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक होते. परंतु, त्यावेळी अशोक मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली. माझ्या उमेदवारीला वळसे पाटील यांनी विरोध केला, असा आरोप करीत आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते खासदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर तालुक्‍यात वळसे पाटील विरुद्ध आढळराव पाटील असा राजकीय संघर्ष सुरू झाला.

आढळराव पाटील यांनी वळसे पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी विविध युक्‍त्या वापरल्या. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. आंबेगाव विधानसभा मतदार संघातून गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांना मताधिक्‍य मिळायचे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीरपणे लोकसभा निवडणुकीत काही तरी गडबड होते, असा आरोप वळसे पाटील यांच्यावर केला होता. परंतु, डॉ. अमोल कोल्हे यांच्या खासदारकीच्या निवडणुकीत वळसे पाटील यांनी ताकद पणाला लावून प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली. त्यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांना 25 हजार मतांचे मताधिक्‍य मिळाले. माझ्या पराभवास वळसे पाटील हेच जबाबदार असल्याने त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढू, असे आढळराव पाटील यांनी जाहीर सभांमधून सांगत वळसे पाटील यांच्यावर जोरदार टिकेच्या फैरी उडवत शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्या प्रचारात रंगत आणली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)