इंदापूर तालुक्यात ऊस, डाळिंब बागांवर घोंगावले संकट : औषध फवारणीसाठी लाखोंचा खर्च
लासुर्णे – इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. पाऊस नसल्याने उसावर हुमणी अळी व डाळिंबवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. इंदापूर तालुक्याचे अर्थकारण असलेली ही पिके वाचविण्यासाठी औषध फवारणीसाठी लाखों रुपये खर्च करावी लागत आहे. रोगराई आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी पुरता वैतागला आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जंक्शन, लासुर्णे, बोरी, बेलवाडी परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरण व हलक्या सरीमुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे. पांढरी शेतजमीन असणाऱ्या जमिनीत ऊस लागवड केलेल्या सुरू व खोडवा ऊस पिकात हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे. हुमणीची अळी उसाची मुळी फस्त करीत असल्याने उस पिक जाळून जाऊ लागले आहे.
मका पिकावर ही लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंबवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. ऑगस्टमध्ये उन्हाचा कडाका व आर्द्रता वाढली होती. त्यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी उसाची व डाळिंब पिकाची जोपासना केली होती. परंतु पिकास केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.