पालिका शाळांतील परीक्षा दिवाळीनंतर

पूरस्थितीमुळे नियोजन लांबणीवर

पुणे – पूरस्थिती आणि त्यानंतर दसरा सणामुळे महापालिका शाळांमधील मुलांच्या सहामाही परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी दिले आहे. शहरात पालिकेच्या अडीचशेंहून अधिक शाळा असून यामध्ये तब्बल 1 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात.

बुधवारी झालेल्या पावसाने शेकडो घरे बाधित झाली आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबांचाही समावेश आहे. येथील जवळपास 700 ते 800 मुले महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात. मात्र, पुरामध्ये या मुलांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. तसेच ही कुटुंबे अजूनही धक्‍क्‍यातून सावरलेली नाहीत. त्यांच्या पुनर्वसनासाठी आणखी एक ते दीड आठवडा लागणार आहे. त्यावेळी दसरा आणि दिवाळीच्या मध्यावर महापालिका शाळेत परीक्षा आहेत. या पूरस्थितीत सापडलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्यच नसल्याने परीक्षा देणे शक्‍य होणार नाही, तसेच त्यांचे शैक्षणिक वर्षही वाया जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी आढावा बैठकीत या सूचना शिक्षण विभागास दिल्या आहेत.

तातडीने मिळणार शैक्षणिक साहित्य
या पूरस्थितीत ज्या मुलांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे, त्यांना ते तातडीनं नव्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुमारे 700 ते 800 मुलांचे सर्वच्या सर्व शैक्षणिक साहित्य वाहून गेल्याने त्यांना परीक्षा देणेही शक्‍य नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पालिकेच्या शाळांमधे परीक्षा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.