पुणे, दि. 2,उपनगर प्रतिनिधी – मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता स्फोट घडवून जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर राडारोड उचलणे तसेच या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. मात्र, आठवडाभरातील नियोजन तसेच दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेले वाहतुकीचे नियोजन यामुळे निर्धारीत वेळेपेक्षा दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली. मात्र, या कालावधीत पुणे-मुुंबई, पुणे-सातारा (खेडशिवापूर टोलनाका), नवले ब्रिज या ठिकाणी अवजड वाहनांची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी अवजड वाहने रस्त्यालगत थांबूवन चाकरमान्यांच्या वाहनांना जागा करून देत वाहतूक सुरळीत केली.
चांदणी चौकातील पूल मध्यरात्री पाडण्यात आल्यानंतर त्याचा सांगाडा तसाच कायम होता, तो काढण्याचे काम पहाटेच्या सुमारास सुरू करण्यात आले. राडारोडा बाजुला काढल्याशिवाय या मार्गावरून वाहतूक शक्य नव्हती. त्यामुळे या कामासाठी तब्बल चार जेसीबी तसेच 30 डंपरचा वापर करण्यात आला. पहाटे 03:00 पासुन राडारोड उचण्याचे काम सुरू करण्यात आले. शनिवारी (दि.1) रात्रीच सातारा आणि मुंबईकडून येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आली होती. मुंबईकडून येणाऱ्या वाहतुकीतील हलकी वाहने तळेगाव येथून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
औंध : बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरामध्ये कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. दुपारपर्यंत परिसरामध्ये वाहतूक सुरळीत झाली. सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास महामार्ग एकदम मोकळा होता. पाषाण पुलाच्या खाली पोलिसातर्फे बॅरिकेट लावून अवजड वाहने थांबविली होती. 11:30 च्या दरम्यान चांदणी चौकातील रस्ता पूर्ववत केल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. त्यामुळे महामार्गावरील वाहने अंतर्गत रस्त्यावर आली नाहीत. पोलिसांनी मज्जाव केल्याने अंतर्गत रस्त्यांवरील कोंडी टळली.
कात्रज : साताऱ्याकडून येणारी अवजड वाहतूक खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात आली होती. साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरिता टिळक रोडने जेधे चौक, पुणे-सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाकडे वळण्यिात आली होती. अवजड वाहनांना शनिवारीच रस्त्यालगत थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परिसरात केवळ मुख्या चौकातच वाहतूक झाल्याचे पहायला मिळाले.
सिंहगड रस्ता : साताऱ्याकडून येणारी वाहने खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यू टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अशी वळविण्यात आल्याने सिंहगड रस्ता परिसरात सकाळी 11:00 वाजेपर्यंत अवजड वाहनांची गर्दी दिसली.