सांगली-जळगावात भाजपचा करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी..!

सांगली जळगावातील भाजपाच्या पराभवावरून सेनेनं घेतला सामना अग्रलेखातून खरपूस समाचार

मुंबई –  जळगाव महापालिकेवर अखेर भगवा फडकावला आहे. शिवसेनेने याठिकाणी सांगली पॅटर्न राबवत भाजपला सत्तेतून बाहेर फेकले आहे. सेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सेनेने तब्बल 45 मतं मिळवली आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे.  याच मुद्यावरून आज सामानाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

या मुद्यावरून सामना अग्रलेखातून याबाबत भाजप पक्षाचा खरपूस समाचार घेतला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील! असं म्हणत भाजप पक्षावर निशाणा साधत ‘सामना अग्रलेख – करेक्ट कार्यक्रम!’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.

काय आहे सामानाच्या अग्रलेख

सांगलीत , जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. जळगावात भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे खडसे यांनी आता सांगितले. मग आता जे सत्तांतर घडवून आणले त्यानुसार ही सर्व आश्वासने पूर्ण करा. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील!

सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला. तेथील पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीचा महापौर केला. हा कार्यक्रम करेक्ट व्हावा यासाठी भाजपच्या 17 नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा पाहून मतदान केले. आता त्यापेक्षा करेक्ट कार्यक्रम जळगाव महानगरपालिकेतही झाला असून भाजपच्या 27 नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा ओळखून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मतदान केले. अशातऱ्हेने सांगलीपाठोपाठ जळगावात भाजपचा गड पडला आहे. जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे. भारतीय जनता पक्षाचा फुगा एकापाठोपाठ एक फुटू लागला आहे. महाराष्ट्रात भाजपला तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळीनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला. एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात राजकीय वितुष्ट आहे. खडसे यांनी भाजप सोडला त्यामागची जी कारणे आहेत त्यातले प्रमुख कारण गिरीश महाजन हे एक आहेच. जळगाव भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता. महानगरपालिका निवडणुकीत

इकडचे -तिकडचे लोक फोडून

महाजन यांनी पालिकेत भाजपची सत्ता आणली. महाजन यांचा कारभार एकतंत्री व अहंकारी होता. त्यामुळेच भाजप नगरसेवक कंटाळले होते. महाजन यांचा अहंकार इतक्या टोकाचा की आपल्यात संपूर्ण क्षमता आहे, पक्षाने जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवतो, अशी भाषा ते करू लागले. इतरांना तुच्छ लेखण्याचा त्यांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला आहे. खडसे यांनी नेमके हेच सांगितले आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता पाच वर्षे होती. त्या सत्तेतून पैसा व पैशांतून सर्व स्तरांवरील सत्ता विकत घेण्यात आल्या. पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपने रुजवला.

 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.