जळगाव – रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या पत्नीच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. अरूण खंडू सोनवणे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरूण सोनवणे यांची पत्नी मीराबाई यांना मागील काही दिवसांपासून दुर्धर आजार जडला होता. उपचारासाठी त्यांना मुंबई येथे नेण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेत होता. मीराबाई यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. मुलगा अनिकेतने वडिलांना आई गेली म्हणून फोन केला. पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकताच अरुण सोनवणे यांना धक्का बसला. पत्नीच्या मृत्यूचा धसका घेवून घरी एकट्या असलेल्या अरुण सोनवणे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. सोनवणे यांचे लहान भाऊ सुनिल सोनवणे हे सकाळी घरात आवराआवर करण्यासाठी आले असता सदर प्रकार समोर आला.
अरूण सोनवणे हे जळगावातील नागसेननगरात पत्नी मीराबाई आणि मुलगा अनिकेतसमवेत राहत होते. जळगाव येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत ते हमालीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. आई-वडिलांच्या जाण्याने अनिकेतवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.