आचारसंहिता लागल्यानंतर…

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा यांनी लोकसभा निवडणुका 2019 च्या कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. देशातील निवडणुका पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या नियमावलीला आचारसंहिता असे म्हणतात. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासन आणि प्रशासनात बरेच बदल होतात.

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी असल्याप्रमाणे काम करतात. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सार्वजनिक निधीचा वापर करण्यावर बंधने येतात. कोणत्याही परिस्थितीत एखाद्या विशिष्ट पक्षाला फायदा होईल अशा एकाही कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सार्वजनिक निधी खर्च करता येत नाही. तसेच सरकारी गाडी, सरकारी विमाने तसेच सरकारी बंगला यांचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाही.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व प्रकारच्या सरकारी धोरणात्मक घोषणा, लोकार्पण, कोनशीला अनावरण, भूमिपूजन अशा प्रकारचे कार्यक्रम करता येत नाहीत.

कोणत्याही पक्षाला अथवा उमेदवाराला किंवा त्यांच्या समर्थकांना रॅली काढण्यासाठी किंवा निवडणूक सभा घेण्यासाठी पोलिसांकडून पूर्वसंमती घेणे बंधनकारक असते.

राजकीय कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पर्यवेक्षकांची नियुक्‍ती केली जाते.

कोणताही राजकीय पक्ष जात किंवा धर्माच्या आधारावर मतदारांकडून मते मागू शकत नाही. असे केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.