बंगळूर – कर्नाटकमध्ये नेतृत्वबदलानंतर मंत्रिपदांसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची रचना हे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यापुढील पहिले मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्रिपद गमावलेल्या बी.एस.येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्य पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याआधी मंत्रिपदाने हुलकावणी दिलेले भाजपचे काही निष्ठावंत यावेळी मंत्री बनण्यास उत्सुक आहेत.
तर, कॉंग्रेस आणि जेडीएसला रामराम ठोकून दोन वर्षांपूर्वी भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर करणारे आमदारही मंत्रिपदांवर दावा सांगत आहेत. येडियुरप्पा यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान देणेही भाजपला भाग पडणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची रचना करताना बोम्मई यांना विविध गटा-तटांना सामावून घ्यावे लागणार आहे.
ते एवढे सहजसुलभ ठरणार नाही. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सल्ल्यानुसार बोम्मई यांना मंत्रिमंडळाची रचना करावी लागणार असल्याचे संकेत आहेत. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीसाठी बोम्मई दिल्ली दौरा करणार आहेत.
मात्र, तो दौरा अजून निश्चित झालेला नाही. त्यामुळे कर्नाटकमधील नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेला विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यातून मंत्रिपदांसाठीचे लॉबिंग आणखीच जोर धरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.