धनश्री विखेंसह 5 उमेदवारांचे अर्ज बाद

छाननीत 26 उमेदवारांचे अर्ज वैध
दहा सूचक न दिल्याने 3 उमेदवारांचे अर्ज झाले बाद

नगर – नगर लोकसभा मतदारसंघासाठी 31 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले. आज छाननीमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्यासह 5 उमेदवारांचा अर्ज बाद झाले. उर्वरित 26 उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले. यात सुदर्शन लक्ष्मण शितोळे यांचा अपक्ष अर्ज वैध तर पक्षाकडून सादर केलेला अर्ज अवैध ठरला. इतर पाच उमेदवारांचे अर्जही अवैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली.

सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात छाननीची प्रक्रिया सुरू झाली. या छाननीत धनश्री सुजय विखे (भाजप) याचा अर्ज बाद झाला. पक्षाचा अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांच्या पत्नीचा अर्ज बाद ठरविण्यात आला. पोपट दरेकर यांनी क्रांतीकारी जयहिंद सेना या पक्षातर्फे अर्ज दाखल केला होता. परंतू हा पक्ष निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याने त्यांनी दहा सूचक देणे आवश्‍यक होते. ते न दिल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्या पद्धतीने सुदर्शन शितोळे व जाकीर शेख यांनी सूचना न दिल्याने त्याचे अर्ज बाद करण्यात आले.

शितोळे यांनी हिंदु एकता आंदोलन पक्ष व शेख यांनी भारतीय मायनॉरीटीज सुरक्षा महासंघ याच्या मार्फत अर्ज दाखल केला होता. भागवत गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यालाही दहा सूचक आवश्‍यक होते. तर विलास लाकुडझोडे यांनी अनामत रक्‍कम जमा केली नाही. म्हणून अर्ज बाद ठरविण्यात आला. छाननीमध्ये नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे- नामदेव वाकळे (बसप), सुजय विखे (भाजप), संग्राम जगताप (राष्ट्रवादी), कलीराम पोपळघट (भारतीय नवजवान सेना-पक्ष), धिरज बताडे (राईट टू रिकॉल पार्टी), फारूख शेख (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), सुधाकर आव्हाड (वंचित बहुजन आघाडी), संजय सावंत (बहुजन मुक्ती पार्टी), आप्पासाहेब पालवे (अपक्ष), कमल सावंत (अपक्ष), सबाजी गायकवाड (अपक्ष), गौतम घोडके (अपक्ष), दत्तात्रय वाघमोडे (अपक्ष), भास्कर पाटोळे (अपक्ष), रामकिसन ढोकणे (अपक्ष), रामनाथ गोल्हार (अपक्ष), सुदर्शन शितोळे (अपक्ष), शेख अबिद मोहम्मद हनीफ (अपक्ष),शेख रियाजोददीन फजलोददीन दादामियॉं (अपक्ष), गणेश शेटे (अपक्ष), साईनाथ घोरपडे (अपक्ष), सुनील उदमले (अपक्ष), ज्ञानदेव सुपेकर (अपक्ष), संजीव भोर (अपक्ष), संदीप सकट (अपक्ष), श्रीधर दरेकर (अपक्ष)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.