मुंबई – अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयला मदत करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञांची जी एक फॉरेन्सिक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा काल दिला आहे.
दरम्यान, एम्स रुग्णालयाच्या अहवाला नंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीकाकारांवर जोरदार तोफ डागली आहे. “स्वत:च्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे उद्योग सुशांतसिंह प्रकरणात झाले. मुंबई पोलीस व महापालिकेविरुद्ध कारस्थान रचले गेले. ‘एम्स’च्या शवविच्छेदन अहवालामुळं हे कारस्थान उधळलं गेलं आहे. आरोग्य यंत्रणा, पोलीस व राजकीय नेत्यांची बदनाम करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा. असं पेडणेकर म्हणाल्या.
सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांत याला विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप केला होता. 14 जून 2020 रोजी सुशांत आपल्याच निवासस्थान मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मीडीयावर काही गटांनी सध्या मोठीच मोहीम चालवली असतानाच हा अहवाल आल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.