मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. त्यांना पोलिस ठाण्यात सातत्याने हेलपाटे मारावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीला दिला आहे.
राऊत यांनी सोमवारी सांगोल्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी उपरोक्त इशारा दिला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठे गुन्हे व भ्रष्टाचार करून ठेवला आहे. त्यांच्या या खोट्यानाट्या कामांचा तपास केला जाईल. येत्या 23 तारखेनंतर फडणवीस व शिंदे यांना खुलासे देण्यासाठी पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील.
यावेळी त्यांना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. त्यातही दिल्लीत फडणवीस यांची झालेली किंमत पाहता त्यांनाही हे पद मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे यावेळी एखादा नवा व चांगला विरोधी पक्षनेता पाहायला मिळेल.
राऊतांनी यावेळी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरही भाष्य केले. यासंबंधी त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला टोला हाणला. जयंत पाटील यांना आपले नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे वाटत असेल तर शरद पवारांनी त्यांच्या नावाची घोषणा करावी, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंचेही कौतुक केले. पंकजा मुंडे यांनी भाजपने 90 हजार गुजराती दलाल या निवडणुकीसाठी आणल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता ही निवडणूकही गुजरातींच्या ताब्यात गेली आहे. ही गोष्ट पंकजा यांनी जाहीर केली हे चांगलेच झाले, असे राऊत म्हणाले.
शहाजी बापूंचे डिपॉझिट जप्त होईल
शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू यांनी आम्हाला आव्हान देण्यापेक्षा निवडून येऊन दाखवावे. यावेळी त्यांचे डिपॉझिटही जप्त होईल. ते मोठ्या वल्गना करतात. पण यावेळी त्यांना स्वतःचे डिपॉझिटही वाचवता येणार नाही.
त्यांनी मला सांगोल्यात येण्याचे आव्हान दिले होते. मी येथे आलो आहे. तुम्ही आता विधानसभेत पोहोचून दाखवा हे माझे आव्हान आहे. असले आव्हान देणारे शिवसेनेने मागील 50-55 वर्षांत खूप पाहिले, असे ते म्हणाले.
बाळासाहेबांनी काँग्रेसचा तिरस्कार केला नाही
बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही. काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत त्यांनी देशाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमीच पाठिंबा दिला होता.
बॅरिस्टर अंतुले, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यासह शरद पवार यांच्याशीही बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण काहींनी टेंभी नाक्याच्या बाहेरचे जग पाहिले नसल्याने त्यांना याची माहिती नाही, असे ते एकनाथ शिंदे यांना टोल हाणताना म्हणाले.