दहा दिवसानंतर मांजरी बुद्रुक मधील कचरा उचल्यास सुरुवात

*सरपंच शिवराज घुले यांची शिष्टाई आली कामी

मांजरी : गेली काही दिवसांपासून मांजरी बुद्रुक येथे ओसांडून वाहत असलेल्या कचराकुंड्यातील कचरा उचलण्यास सोमवार पासून सुरुवात झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरपंच शिवराज घुले यांनी संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तूर्तास आहे त्या जागेवर कचरा टाकण्यास परवानगी मागितली. त्यास प्रतिसाद मिळाल्याने कचरा कोंडी फुटली आहे.

गेल्या आठ दहा दिवसांत मांजरी बुद्रुक येथे कचराकुंड्या न राहता गावात विविध ठिकाणी कचऱ्याचे डेपोच तयार झाल्याचे चित्र तयार झाले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर, कालपासून सोमवारी (ता. १९) सरपंच शिवराजअप्पा घुले यांच्या उपस्थितीत, महादेवनगरपासून जेसीबीच्या साहाय्याने कचरा उचलण्याचे काम सुरू झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय धारवाडकर तसेच इतर सदस्यही उपस्थित होते. याबाबत सरपंच शिवराजअप्पा घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कचरा डेपो ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना मी स्वतः विनंती केली आहे.

आता गाव थोड्याच दिवसांत महापालिकेत समाविष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. सध्या कोरोनोच्याबाबत मांजरी हॉटस्पॉटमध्ये आहे. तेव्हा किमान महिना-दोन महिने कचरा टाकण्यास अटकाव करू नये. ही सारी वस्तुस्थिती ऐकल्यावर या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. गेल्या ७-८ वर्षांपासून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. महानगरपालिकेशीही पत्रव्यवहार केला होता. त्यांनी कचरा विल्हेवाट लावण्यासाठी टनामागे रु. ५५३ ची मागणी केली होती. तसेच ओला व सुका असे वर्गीकरण करून पदर खर्चाने महानगरपालिकेकडे आणून द्यावा, अशी त्यांची अपेक्षा होती. दर कमी करण्यासंदर्भातील बोलणी झाली. हा आर्थिक भार ग्रामपंचायतीस पेलणे हेही जिकीरीचे काम होते. परिणामी या प्रयत्न करून निष्फळ ठरला.

गावातील बऱ्याच भागात ग्रामपंचायतीच्या वतीने आता ओला आणि सुका कचरा ठेवण्यासाठी नागरिकांना मोफत प्लॅस्टिक बादल्यांचे वाटप करण्यात आले आहे. कचरागाड्यांवरील लाऊडस्पीकरच्या माध्यमातून कचराप्रश्नाचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. तेव्हा नागरिकांनीही आता जबाबदारीने वागून ओला आणि सुका कचरा असा विलगीकरण करूनच कचरा जमा करावा. वेगाने होणाऱ्या नागरीकरणामुळे अस्तित्वात असलेल्या अनेक ग्रामपंचायतीचे कचरा व्यवस्थापन कोलमडून पडत आहे. अशा समस्यांना सामोरे जात असताना यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा सूतोवाच सरपंच घुले यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.