मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेते सैफ अली खान यांच्यावर अज्ञात चोरट्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता अर्जुन कपूरसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. अर्जुन कपूरचा त्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. यावेळी अभिनेत्यासह चित्रपटाच्या टीममधील काही लोक जखमी झाले आहेत.
अभिनेता शूट करत असताना अचानक सेटवर अचानक छत कोसळले आणि हा अपघात झाला. यामध्ये अर्जुन कपूर, दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्यासह सहा लोकांना दुखापत झाली आहे. रॉयल पाम्सच्या इंपीरियल पॅलेसमध्ये या सिनेमाचे शूट सुरू होते. यावेळी अर्जुन कपूर व्यतिरिक्त सेटवर भूमी पेडणेकर, जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंगही हजर होते.
दुर्घटना घडली त्यावेळी अर्जुन आणि भूमी चित्रपटाच्या गाण्याचे शूट करत होते. त्याचवेळी अचानक छत कोसळले. या अपघातात अर्जुन कपूर, दिग्दर्शक मुदस्सर अजीज, जॅकी भगनानी यांना दुखापत झाली आहे. या दुर्घटनेत काही क्रू मेंबर्सही जखमी झाले आहेत. डीओपी मनू आनंद यांचा अंगठा फ्रॅक्चर झाला, तर कॅमेरा अटेंडंटला पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाहीत.