आश्‍वासनानंतर राहुरीतील उपोषण मागे 

राहुरी  – राहुरी ग्रामीण रुग्णालय प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी आज तहसीलदार कार्यालयात दोन बैठका झाल्या. राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले व नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे घेतले गेले. पालीका तातडीच्या बैठकीत ग्रामीण रुग्णालयाची जमीन बक्षीसपत्र करण्याचा ठराव संमत करेल आणि भूमीअभिलेख विभाग त्याप्रमाणे जमीन नावावर करुन मोजणी करेल, बांधकाम विभाग तातडीने पुढील कार्यवाही करेल असे आश्‍वासन देण्यात आले.

राहुरी तालुक्‍यातील ग्रामीण रूग्णालयाबाबत कालपासून सुरू असलेल्या उपोषणाबाबत आमदार कर्डिले यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये चांगलीच खडाजंगी होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर मुख्याधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले असता अखेर यामध्ये भूमी अभिलेख कार्यालय दोषी असल्याचे चर्चेमध्ये दिसून आले. तर भूमी अभिलेखचे अधिकारी बैठकीला गैरहजर असल्याने बैठक स्थगीत करून पुन्हा सायंकाळी बैठक झाली. ती मध्ये हा तोडगा निघाला.

राहुरी ग्रामीण रूग्णालय व तनपूरेवाडी रोड लगत असलेल्या हरिजन समाजाच्या दफनभूमीवर झालेल्या अतिक्रमणबाबत आरपीआयच्या वतीने विलास साळवे व आनंद तरंगचे बबन साळवे यांनी रूग्णालयाजवळ बेमुदत उपोषण सुरू केले होते. आमदार कर्डिले यांनी आज दुपारी एक वाजता तातडीची बैठक बोलावली.

या बैठकीत आमदार कर्डिले यांच्यासह नगराध्यक्ष प्राजक्त तनपूरे, मुख्याधिकारी अनुप डुरे, सार्वजनिक बांधकाम अभियंता फुलचंद जाधव, तहसीलदार फसेउद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख, वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण आदिसह नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपूरे, माजी नगरसेवक चाचा तनपूरे, प्रकाश भूजाडी, सूर्यकांत भूजाडी, रोहिदास दातीर आणि पत्रकार उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष प्रविण लोखंडे व बाळासाहेब जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

यावेळी आरोप प्रत्यारोप होऊन मोठ्या प्रमाणावर खडाजंगीठ झाली. तर आमदार कर्डिले आणि नगराध्यक्ष प्राजक्त तनपूरे यांनी समजदारीची भूमिका घेऊन काही झाले तरी ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्‍न मार्गी लागला पाहिजे, असे भूमिका घेतली. मात्र यावेळी भूमी अभिलेखचे अधिकारी बैठकीला गैर हजर असल्याने कोणताही निर्णय घेता आला नाही. त्यामुळे बैठक स्थगीत करून पुन्हा सायंकाळी चार वाजता बैठक झाली. ती मध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने उपोषण मागे घेतले गेले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.