मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी एक व्हिडीओदेखील त्यांनी या सभेत दाखवला होता. यावेळी त्यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने कारवाई करू असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळपासून या बांधकामावर हातोडा फिरवण्यात येत आहे.
या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वृत्तवहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरेंनी समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा मुद्दा उचलला होता. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला कोणत्याही प्रकारे थारा द्यायला नको. प्रशासनानं ज्या तत्परतेनं कारवाई केली, आम्ही त्यांचं अभिनंदन करू… मात्र गेल्या दोन वर्षांत ज्याप्रकारे अक्षम्यरीत्या या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. मविआच्या काळात, करोनाच्या काळात याकडे दुर्लक्ष झालं की जाणीवपूर्वक त्यांनी दुर्लक्ष केलं की त्यांना दुर्लक्ष करण्यास सांगण्यात आलं हा सगळा संशोधनाचा विषय आहे”, असं संदीप देशपांडे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मेळाव्यात माहीम भागातील समुद्रात असणाऱ्या दर्ग्यात अनधिकृतबांधकाम करण्यात आले असून जर हे बांधकाम पाडले नाही तर त्या ठिकाणी गणपतीचे मंदिर बांधू असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर आज सकाळी मुंबई महापालिकेचे अतिक्रम विरोधी पथक माहीमच्या समुद्रात दाखल झाले होते. त्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली होती.
अखेर माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई आता पूर्ण झाली आहे. दरम्यान, माहिम किनारा परिसर आणि दर्ग्याभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अखेर राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर माहिम दर्ग्याच्या मागे असणाऱ्या वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली.