मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रसिध्द पत्रकाव्दारे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लगेचच त्यांच्यापाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला तर राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जूनला आहे.
आदित्य ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करुन याबाबतची माहिती दिली. यामध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, “आज आपल्या महाराष्ट्र राज्यावरच नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. गेले 2-3 महिने आपण सगळे एकत्रितपणे या संकटाविरूध्द लढा देत आहोत आणि हा लढा देत असताना आपले सर्वाचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोरोनावर मात करणे.
पुढे ते म्हणतात, “13 जूनला माझा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला आशीर्वाद व शुभेच्या द्याव्यात. माझी तमाम शिवसैनिक, मित्रमंडळी आणि सर्वांना विनंती आहे की होडिंग्ज, हार तुरे, केक हा खर्च टाळून तो खर्च तुम्ही कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे एक सहकार्य होईल आणि मला याचा निश्चितच आनंद होईल.
पुढे आदित्य ठाकरे म्हणतात की, “प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून आपण प्रशासनाला सहकार्य करूया. तुम्ही सर्वजण कोरोनापासून स्वत:ची काळजी घ्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल. जसे तुम्ही मला आजपर्यंत प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत तसेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यापुढे सुध्दा माझ्यासोबत राहिल हीच अपेक्षा.