नवी दिल्ली : अमेरिकेत राहुल गांधी यांनी शीख समुदायांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी राहुल गांधींच्या विधानावर आक्षेप घेत बुधवारी (11 सप्टेंबर) दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या निदर्शनादरम्यान भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिल्याचे समजत आहे.
काय म्हणाले तरविंदर सिंग?
दिल्ली भाजपचे नेते आणि माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी या आंदोलनादरम्यान राहुल गांधींना धमकी दिली होती. ‘ राहुल गांधी वेळीच सावध व्हा ( आवरा स्वत:ला), नाहीतर येत्या काळात तुमचीसुद्धा आजीसारखीच गत होईल ‘असा इशारा त्यांनी दिला होता. हा व्हिडीओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला आहे. एका शीख व्यक्तीने भारतात पगडी अथवा कडे घालावे की नाही. एक शीख म्हणून ती व्यक्ती गुरुद्वारात जाऊ शकते की नाही. यासाठी लढाई आहे आणि ही केवळ त्यांच्यासाठीच नाही तर सर्व धर्मांसाठी आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले होते.
काँग्रेसने केली कारवाईची मागणी
काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे. ‘ भाजपचा हा नेता उघडपणे विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देत आहे, नरेंद्र मोदीजी, तुमच्या पक्षाच्या या नेत्याच्या धमकीवर तुम्ही गप्प बसू शकत नाही’, अशी पोस्ट करत काँग्रेसकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.