पंजाबनंतर कॉंग्रेसचा फोकस राजस्थानवर

राहुल, प्रियांका गांधींची पायलट यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी येथे राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पंजाबनंतर कॉंग्रेसचा फोकस राजस्थानवर असल्याचे सूचित होत आहे.

कॉंग्रेसने नुकताच आपली सत्ता असणाऱ्या पंजाबमध्ये मुख्यमंत्रीबदल केला. पक्षाने पंजाब शाखेतील अंतर्गत कलह विकोपाला गेल्याने ते पाऊल उचलले. आता राजस्थानमधील घडी बसवण्यासाठी कॉंग्रेस सरसावल्याचे मानले जात आहे. त्या राज्यात कॉंग्रेस पक्ष दोन गटांत विभागला गेल्याचे चित्र आहे. एक गट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना, तर दुसरा पायलट यांना मानणारा आहे. त्या गटांमध्ये मागील वर्षी सत्तासंघर्षही झाला.

पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले होते. मात्र, कॉंग्रेस श्रेष्ठींना पायलट यांची मनधरणी करण्यात यश आले अन्‌ पेच टळला. पण, पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या दोन्ही पदांना मुकावे लागले. त्यांच्या समर्थकांकडून मागील काही काळापासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची आणि पक्ष संघटनेच्या फेररचनेची मागणी होत आहे. ती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आता कॉंग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्याचे मानले जात आहे. पायलट यांच्या दिल्ली भेटीकडे त्या दृष्टीनेच पाहिले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.