पानिपत – पानिपतचे तिसरे युद्ध इतिहासातील सर्वांत मोठी घटना आहे मराठ्यांची वीरता आणि शौर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला छत्रपतींच्याच आशीवार्दाने संपूर्ण भारतामध्ये पसरवण्याचे काम मराठ्यांनी केले. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा तांत्रिकदृष्ट्या पराजय झाला, तरी मराठे कधीच हारले नाहीत. पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांनी आपले शौर्य इतके वाढवले की, या भारतावर आक्रमणे करण्याची हिंमत कुणाची झाली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला आज 264 वर्षे पूर्ण झाली. या युद्धात मराठ्यांचा अफगाणीस्तानचा बादशाह अहमदशहा अब्दालीकडून पराभव झाला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी पानिपत येथे मराठा योद्धांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. आज भगव्या झेंड्याखाली आणि भारताच्या तिरंग्याखाली सगळ्यांना एकत्रित येणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
पानिपतच्या शौर्यभूमीला वंदन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आमचा इतिहास जीवंत ठेवण्याचे काम केल्याबद्दल शौर्य भूमीच्या ट्रस्ट मनापासून आभार मानतो. मातृभूमीसाठी धारातीर्थी पडलेल्यांना या ट्रस्ट आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने आदरांजली, श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम चालतो. या कार्यक्रमातून आमच्या शौर्याचे एकप्रकारे संवर्धन करण्याचे काम हे ट्रस्ट करत आहे. याबद्दल मी ट्रस्टचे अभिनंदन करतो. पानिपत येथील स्मारक अधिक चांगले करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता पडले, महाराष्ट्र सरकार पुढाकार घेऊन त्या सर्व गोष्टी करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एक है तो सेफ है चा पुनरुच्चार
फडणवीसांनी यावेळी जातीपातीच्या राजकारणावरही भाष्य केले. छत्रपती शिवरायांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या स्वराज्यामध्ये 18 पगडजातीचे लोक एकत्रितपणे मावळे म्हणून लढले. त्यांनी स्वराज्य विस्तारीत करण्याचे काम केले. छत्रपतींनी सामान्य माणासामध्ये पौरुण जागृत करून त्याला असामान्य बनवले. जोपर्यंत एकत्रित आहोत, तरच सुरक्षित आहोत, एकत्रित आहोत, तरच प्रगती आहे. तोपर्यंत प्रगती होत राहील, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे एक हैं तो सेफचा पुनरुच्चार केला.